Thursday, 11 December 2014

खरी आई कि खोटी आई

एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे?म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''

तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. 

No comments:

Post a Comment