Wednesday, 5 November 2014

जिद्द

जिद्द
मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,"मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर". आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला.
त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,"अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?". त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले," अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही." वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले.
दुसर्‍या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले," मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक."
आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाला, " हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही"

No comments:

Post a Comment