चला जाणून घेऊया - "वाचनाचे टप्पे"
वाचनाचे टप्पे :
एक आराखडा - जीन एस्. चॉल
सारांशात्मक मराठी रूपांतर - वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)
(‘वाचन-विकासाचे टप्पे’ (Stages of Reading Development), न्यूयार्क, मॅक ग्रॉहिल बुक कंपनी, १९८३ यामधील दुसर्या प्रकरणामधून.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते परिपक्वतेच्या टप्प्यापर्यंत टप्पे प्रस्तुत आराखड्यात विचारात घेतले आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांचे विवेचन येथे आहे. त्यात “खोटे-खोटे” वाचण्यापासून ते सर्जनशील परिपक्व वाचनापर्यंत विशिष्ट क्रमाने प्रगती होते. प्रत्येकाचा प्रगतीचा वेग भिन्न असला, तरी साधारणपणे याच क्रमाने टप्पे पार केले जातात. अगदी, विशेष गरज असलेले विद्यार्थीही याच टप्प्यांमधून जातात.
व्यक्ती किंवा मूल आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातले घटक यांच्यामधील आंतरक्रियांवर प्रगतीचा वेग ठरतो.
प्रस्तुत लेखात, वाचनाचे टप्पे सैद्धांनितक स्वरूपात मांडावेत असा हेतू नाही. ढोबळपणाने गृहितकांच्या रूपात ते मांडले आहेत. वाचन कौशल्ये कसकशी आत्मसात केली जात आहेत याचा अंदाज येण्यासाठी, त्यावर काहीसे नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची मदत होईल अशी आशा वाटते.
व्यक्तीमध्ये आणि भोवतालामध्ये असे नेमके काय काय घडते की ज्याचा वाचन विकासाशी संबंध आहे, हा या आराखड्याचा गाभ्याचा भाग आहे. आराखडा ढोबळ आहे, मात्र त्याचा संशोधनांमधील बारीकसारीक तपशिलांशी, निष्कर्षांशी सूक्ष्म पण थेट संबंध आहे. अवतीभवतीच्या घटकांची दखल संशोधक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. जोडीला, मज्जासंस्थेशी संलग्न अशा घटकांचीही मी विशेष दखल घेतली आहे.
पियाजे आणि इनहेल्डर यांचा विकासविषयक सिद्धांत आणि फ्रॉईड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत यांच वोल्फ यांनी केलेला तुलनात्मक अभ्यास, पेरी यांनी केलेल्या महाविद्यालयीन काळातील बौद्धिक आणि नैतिक विकासाचा अभ्यास, डेल यांच्या बरोबर मी केलेल काम, तसेच १९५८ मध्ये मी स्वतः केलेले वाचनाविषयीचे काम...अशा अनेक अभ्यासांचा प्रभाव या आराखड्यावर आहे. वाचन अक्षमता असणार्यांबरोबर क्लिनिकमध्ये आणि शिक्षक म्हणून मी केलेल्या कामाचाही या आराखड्यासाठी उपयोग झाला आहे.
‘वाचन’ समजून घेण्यासाठी मौल्यवान ठरतील अशा कल्पना, विचार आणि पद्धती या अभ्यासांमधून घेऊन प्रस्तुत आराखडा बनवला आहे. हा आराखडा पुढील गृहीतकांवर आधारित आहे.
1.भाषाविकासाच्या आणि बुद्धिविकासाच्या टप्प्यांत आणि वाचनविकासाच्या टप्प्यांत साधर्म्य आहे.
2.पियाजे यांच्या सिद्धांतामधील परिभाषेत सांगायचे, तर ‘ग्रहण करून समजून घेणे’ (अॅसिमिलेशन) आणि आधी असलेल्या चौकटीत फेरबद्दल करून नव्या गोष्टी ‘सामावून घेणे’ (अॅकोमोडेशन) या प्रक्रिया वाचन शिकणारा करीत असतो. अशा प्रकारे वाचन ही त्याच्यासाठी एक समस्यानिवारणाची सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. आधी जे शिकले, त्याचा वापर करून नवीन मागण्या पूर्ण करायच्या असे सर्व टप्प्यांवर घडते.
3.सर्व टप्प्यांमधून पुढे जाताना व्यक्तीची निरनिराळ्या ‘भोवतालांशी’ आंतरक्रिया होत असते – घरी, शाळेत, समाजात आणि संस्कृतीत.
4.विशिष्ट टप्पा शिकणार्याने गाठला किंवा कसे हे मोजण्यासाठीच्या निकषांमुळे, प्रमाणित निकषाधारित मूल्यमापनाला नवे परिमाण मिळेल. वाचनाचा विकास कसा होतो याविषयीचे आकलन वाढायला याची मदत होईल. वाचायला शिकणार्यांना अधिक मदतीची गरज असेल, तर त्यासाठी जरूर ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही त्याची मदत होईल.
5.‘वाचन’ हाच शब्द सर्रास सर्व टप्प्यांसाठी वापरला जात असला, तरी टप्प्याटप्प्यानुसार, लिखित मजकुराबाबत वाचक जे करतो, ते निरनिराळे असेल. नजरेची हालचाल, नेत्र-ध्वनि यांचा आवाका, वाचनाचा वेग इत्यादींची कार्यक्षमता टप्प्याटप्प्यानुसार बदलेल.
6.टप्प्यांनुसार ‘वाचना’कडे बघण्याची दृष्टी आणि समज बदलत जाईल. अधिकाधिक गुंतागुंतीचा मजकूर वाचण्याची क्षमता प्रत्येक पुढच्या टप्प्यावर विकसित होत जाईल.
7.मजकुराला येणारा वाचकाचा प्रतिसादही प्रत्येक पुढील टप्प्यात अधिक प्रगल्भ होत जाईल.
8.प्रत्येक टप्प्यासाठी कोणते पूर्वज्ञान आवश्यक आहे हे विशद केले असेल. टप्पा जितका पुढचा, तितके वाचकाचे जगातले अनुभव जास्त, समज जास्त आणि ज्या विषयावर वाचायचे त्या विषयाची समज जास्त.
9.एकाच टप्प्यातील सवयींमध्ये फार काळ रेंगाळल्यास वाचक पुढच्या टप्प्याकडे जरा उशिराने जाईल, कदाचित पुढच्या टप्प्यात शिरण्यात त्याला बर्याच अडचणी येतील. उदारहणार्थ, सुटी अक्षरे ओळखण्यामागोमाग लगेचच वेग वाढवून, संदर्भातील अर्थपूर्ण वाचनाला सुरुवात झाली नाही, तर वाचक अक्षरे ओळकू येण्याच्या यशापाशीच रेंगाळतो. त्यापुढील तिसर्या टप्प्यात, नेमकेपणाने वाचून नवी माहिती मिळवण्यापाशी पोहोचण्याकरिता नवी आव्हाने पेलायला वाचक शिकला नाही, तर संदर्भावरून अर्थाची अटकळ बांधत वाचण्यापाशीच तो दीर्घकाळ अडकतो.
10.भावना आणि बोध या दोहोंशी जोडलेले घटक वाचनात अंतर्भूत असतात. वाचनाकडे बघण्याची वाचकाची दृष्टी, त्याच्या घरी, संस्कृतीत आणि शाळेत वाचनाकडे कसे पाहिले जाते यावर अवलंबून असते. मजकुराशी सर्वार्थाने भिडणे हे प्रत्येक टप्प्यावर घडायला हवे – मजकुराचा आशय, त्यातले विचार आणि त्यातली मूल्ये, प्रेरणा, ऊर्जा, साहस आणि धैर्य यांचाही विचार वाचनाच्या परिपूर्ण विकासाच्या संदर्भात करणे आवश्यक आहे.
टप्प्यांसाठी पुढे दिलेल्या वयोगटात देश, संस्कृती, सामाजिक पार्श्वभूमी यानुसार बदल होऊ शकतात.
शून्यावा टप्पा : वाचनपूर्व टप्पा (जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत)
हा टप्पा सर्वात दीर्घ आहे. सर्वाधिक बदलही याच टप्प्यात होतात. साक्षर संस्कृतीत वाढणार्या मुलांना जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंतच्या कालावधीत लिहिणे, अक्षरे, शब्द, पुस्तके याबद्दलचे खूपसे ज्ञान मिळते. वाक्यरचना आणि शब्द अशा वेगवेगळ्या भाषिक अंगांवर प्रभुत्तव मिळवत मुले मोठी होतात. शब्दांविषयी मर्मदृष्टीही मुलांना येते – काही शब्द त्याच अक्षराने सुरू होतात, काही शब्द त्याच अक्षराने संपतात. (अनुप्रास आणि यमक)
संशोधनांमधून पुढील गोष्टी लक्षात आल्या आहेत – मुळाक्षरामधला फरक मुलांना या वयात ओळखता येतो. बर्याचशा मुळांक्षरांची नावे मुले या वयात सांगू शकतात. काही अक्षरे किंवा स्वतःचे नाव काही मुलांना कागदावर उमटवता येते. रस्त्यांची नेहमीची नावे किंवा टी.व्ही. वरच्या जाहिरातीतील उत्पादकांची नवे ही मुले ओळखू शकतात. आपल्या आवडत्या पुस्तकातले काही शब्द मुले वाचू शकतात. ‘अक्षरांशी साधर्म्य असलेले आकार’ आणि ‘लिहिलेले’ यातून लिहिलेले कोणते हे या वयाची बरीच मुले ओळखतात. एखादे पुस्तक मुले “खोटे खोटे” वाचतात असेही या वयात आढळते. वाचल्यासारखे करीत या वयाची मुले गोष्टीतले तपशीलही सांगतात, वेळोवेळी पानही उलटतात !
वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे(वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी(वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.
पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.